"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Monday, August 16, 2010

खरे ‘शहीद’ कोण? जिहाद ते जन्नत व्हाया शहीद!

गेल्या काही दशकांत वाढलेल्या आव्हानांमुळे वर्तमानपत्रात दररोज सुरक्षा दलाचे कोणी ना कोणी ‘शहीद’ झाल्याची बातमी असते. कुठे काश्मीर मध्ये तर कुठे नक्षलींनी केलेल्या भ्याड हल्ल्यात. आपणही सहजगत्या वापरतो, एवढे सैनिक ‘शहीद’ झाले.. ‘शहीद’ अमुक अमुक अमर रहे.. वगैरे.
पण आपण विचार केलाय का की, ‘शहीद होणे’ म्हणजे नक्की काय होणे? केवळ लढताना जो मृत्यू पावेल त्याला ‘शहीद’ म्हणायचे का? करकरे, कामटे, साळसकर, ओंबाळे, संदीप उन्नीकृष्णन हे सगळे नक्की ‘शहीद’ झाले, की अतिरेकी ‘शहीद’ झाले? त्यासाठी ह्या शब्दाच्या मुळाशी जायला हवे.

पहिल्यापासूनच आपल्या येथल्या ‘पंडितांना’ अल्पसंख्यकांचे काय प्रेम! उतू जाणारे ते प्रेम सरकारी शक्ती आणि सरकारी साधनसामुग्री ठराविक समुदायासाठी न वापरावयास लावते तरच नवल. ती परंपरा चालूच आहे. म्हणून ठराविक यात्रांसाठी ‘स हज’ अनुदान दिले जाते, आणि ठराविक यात्रांवर हल्ले होऊन यात्रेकरू ‘अमर’ झाले तरी ‘नाथ’कृपा होत नाही. काही भाषांना कोण प्रोत्साहन दिले जाते. ज्यातला ओ का ठो कळत नाही त्या ऊर्दू कडे खासे लक्ष पुरवले जाते. पण सर्व भारतीय भाषांची जननी असलेल्या संस्कृतच्या पदरी सरकारदरबारी उपेक्षाच!

हल्ली च्या हिंदी बातम्या देणाऱ्या वाहिन्या म्हणजे निव्वळ टाकाऊ प्रकार झाला आहे. हा खरा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण त्यात वाढलेल्या ऊर्दू शब्दांचे प्रमाण लक्षणीय आहे. चांगले शब्द हिंदीत उपलब्ध असतानाही अगम्य ऊर्दू शब्द वापरण्याची भारीच हौस. ‘महज’, ‘रुझान’, ‘नतीजा’, ‘गौरतलब’, ‘पुख्ता इंतजाम’, ‘मौजूद’, ‘मशहूर’, ‘खारिज’, ‘वक्त’, ‘पैगाम’, ‘बावजूद’ असे अनेक शब्द तुम्हालाही जाणवतील. संस्कृतप्रचुर शब्द वापरून हिंदी बोलल्यास अधिक गम्य तर होईलच, परंतु ती छान आभूषणांनी सजलेल्या सौंदर्यवती युवतीप्रमाणे भासेल. पण आपल्यावर अज्ञानाचा आणि दुर्लक्ष करण्याचा बुरखा चढल्याने आपण असा प्रयत्न करत नाही.

नतीजा ऐवजी परिणाम, वक्त ऐवजी समय, मौजूद ऐवजी उपस्थित, रुझान ऐवजी अनुमान, मशहूर ऐवजी विख्यात असे सोपे प्रतिशब्द आहेत. शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या अशाच प्रकारातून आला आहे ‘शहीद’. मी माझ्या मागील एका लेखात भाषा हा केवळ शब्दसमूह नसून भाषेला इतिहास, परंपरा, विचार, संस्कृती यांची झालर असते असा विचार मांडला होता (पहा : "नावात काय (नाही) आहे?" ) त्यामुळे काही शब्दांचे भाषांतर होऊ शकत नाही, कारण त्याला विशिष्ट भूमिका, तत्वे चिकटलेली असतात. म्हणूनच ‘जिहाद’, ‘गाझी’, ‘दार-उल्-हरब’, ‘बुतशिकन’, ‘काफिर’, ‘कत्लेआम’ अशा शब्दांचे विशिष्ट अर्थ आहेत. ते समजून घेणे आवश्यक आहे. ते शब्द त्यासाठीच वापरणे योग्य होईल. आणि याच रांगेत उभा आहे ‘शहीद’.

‘जिहाद’ मुळे सध्या संपूर्ण जगच भाजून निघत असल्याने मी त्याचा अर्थ स्पष्ट करण्याची गरज नाही. ज्याने त्याने अर्थ समजावा. ज्याला जेवढा चटका बसला असेल आणि जो जितक्या प्रमाणात भाजला असेल त्याला ‘जिहाद’ चा अर्थ तेवढा कळेल. तर जो जिहाद करतो आणि ज्याला जन्नत प्राप्त होते तो शहीद होतो. म्हणजेच जिहाद, शहीद आणि जन्नत असा प्रवास आहे. जिहाद ते जन्नत व्हाया शहीद. आता आपले सैनिक यात कुठे बसतात? “ "Shaheed" is only applied to those who sacrifice their lives for Allah's (God's) cause.  They have no fear; they only fear Allah and want to obey Him and to serve Him.आणि शिवाय The Shaheed must have in his intention to risk his life only for Allah and not for anyone else.” पहा : http://www.2600.com/news/mirrors/harkatmujahideen/www.harkatulmujahideen.org/jihad/t-shahed.htm 



२६/११ च्या हल्ल्यात नक्की कोण ‘शहीद’ झाले? आता लक्षात आले असेल. शिवाय केवळ शहीद च्या वापरापलिकडे जाऊन त्याचे ‘शहादत’ असेही एक रूप वापरणे सुरु आहे. ‘शहादत पर हुई राजनीती’, ‘शहादत पर शक’, ‘शहादत की सियासत’ इ. हा प्रकार थांबायला हवा. आपण अभिमानाने पोस्टर लावतो ‘शहीदांचा अभिमान’! आपली भावना पक्की आणि तीव्र असते. पण शब्दाने होतो ब्रह्मघोटाळा. ठराविक विचारसरणीसाठी, कट्टर बनून, जन्नत मिळवण्यासाठी ठराविक जणच शहीद होतात.
तेव्हा आपल्या वीरांचा अपमान आपणच थांबवूया. मराठीत सुंदर शब्द/शब्दसमूह आहेत, ‘वीरगतीला प्राप्त झाले’, ‘बलिदान केले’, ‘हौतात्म्य पत्करले’, ‘प्राणार्पण केले’, ‘धारातीर्थी पडले’, ‘प्राणांची बाजी लावून’, यातून जो भाव प्रकट होतो तो आपल्याला अभिप्रेत असायला हवा. म्हणूनच ‘अफझलखान शहीद झाला’, पण ‘तानाजी मालुसरेंनी मुलाच्या लग्नापेक्षा सिंहगडावर हौतात्म्य पत्करले’ आणि ‘बाजी प्रभू खिंड लढवताना धारातीर्थी पडले’. तेव्हा आगामी काळात आपल्या शालेय पुस्तकात ‘तानाजी मालुसरे शहीद झाले’ असे छापून आल्याचे दुर्दैवी चित्र पाहायचे नसेल तर हा विचार प्रसृत करायला हवा.