"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Thursday, August 29, 2013

पाकिस्तानातील मदरसे

['सांस्कृतिक वार्तापत्र' या पुणे स्थित पाक्षिकासाठी लिहिलेला हा लेख इथे पुनर्मुद्रित करत आहे.]
हिंदू आणि त्यातूनही मराठी मनाला असा प्रश्न पडणे साहजिक आहे की, शेजारील राष्ट्रातील धार्मिक शिक्षण देणाऱ्या प्रणालीचा एवढा विचार करण्याची आवश्यकता काय आहे? परंतु सांस्कृतिक वार्तापत्राचे जे वाचक आहेत त्यांना खचितच या विषयाचे गांभीर्य माहित आहे.
पाकिस्तान आपले केवळ शेजारी राष्ट्र राहिलेले नाही तर ते एक उघड ‘शत्रूराष्ट्र’ त्याच्या आरंभापासूनच झालेले आहे. भारतविरोध-हिंदूविरोध हा त्याच्या निर्मितीचा पाया आहे. किंबहुना म्हणूनच पाकिस्तानातील ‘मदरसा’ या एका प्रणालीचा आपण सखोल विचार केला पाहिजे.
धर्म हा शब्द पूर्वीपासूनच चर्चेचा विषय राहिलेला आहे. परंतु पश्चिमी जगताला ‘रिलिजन’ या शब्दातून जो बोध अपेक्षित आहे तो भारतीय अथवा हिंदू मनाला ‘धर्म’ या शब्दातून अपेक्षित नाही. तेव्हा रिलिजन म्हणजे संप्रदाय होऊ शकेल, धर्म नव्हे. म्हणून इस्लाम अथवा ख्रिश्चन हे संप्रदाय होत. उपासनापद्धती होत. 
इस्लाम संप्रदायाचा हिंसक मार्गावरील विश्वास लपून राहिलेला नाही. बुत शिकन, बुत परश्त, जिहाद, जिझिया, जकात, काफर, दार उल् हरब, दार उल् इस्लाम या संकल्पनांमधून उघडपणे इस्लाम एका सर्वव्यापी इस्लामी जगताचेच स्वप्न पाहतो आणि ते सत्यात उतरवण्यासाठी हिंसेचा आधार घेतो हे सर्वविदित सत्य आहे. या इस्लामच्या मार्गावर ‘मदरसा’ कशाप्रकारे सहाय्यभूत ठरते, मदरसांतून कसे कार्य चालते, त्यात बदल होऊ शकतील का? अशा प्रश्नांचा विचार या लेखात केला आहे.
जन्मतःच कोणी अतिरेकी नसतो. अतिरेकी हे पद्धतशीरपणे घडवले जातात. त्यांचे काफिले तयार केले जातात आणि मग ते सोडले जातात रक्तपात घडवण्यासाठी. संसदेवरील हल्ल्याच्या, २६/११ च्या मुंबईच्या आणि तत्सम घटनांच्या द्वारे भारतीय आता या प्रकाराशी चांगलेच परिचित झाले आहेत. जगभर चिंतेचा विषय होऊन राहिलेल्या इस्लामी मूलतत्ववादाच्या प्रकटीकरणात ‘मदरसा’ आपली प्रमुख भूमिका बजावत आहे. आणि त्यामुळेच आपले शत्रुराष्ट्र असलेल्या आणि इस्लामी अतिरेकाचे वैश्विक अपिकेंद्र असलेल्या ‘पाकिस्तानातील मदरसे’ कसे काम करतात, त्यांची कार्यपद्धती कोणती हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे.
मदरसाचे थोडक्यात वर्णन करायचे झाले तर म्हणता येईल की, ‘इस्लाम संप्रदायाचे एकसुरी, कट्टर, झापडबंद प्रशिक्षण देणाऱ्या निवासी संस्था म्हणजे मदरसा’. मुले तिथे चार भिंतीत राहूनच हे प्रशिक्षण घेतात. त्यांना तिथे इस्लाम कसा सर्वश्रेष्ठ आहे आणि संपूर्ण जगावर केवळ इस्लामचे राज्य आणणे हे आपले कसे जीवनकर्तव्य आहे याचा पाठ पढवला जातो.
प्रवेशप्रक्रिया – मदरसांमध्ये सर्वांनाच मुक्त प्रवेश नसतो. प्रवेशपरीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मदरसा प्रवेश मिळतो. तेव्हा ज्या मुलांना प्रवेश मिळालेला असतो त्यांच्या मनावर मुळात आधी हे बिंबवले जाते की ते ‘विशिष्ट बुद्धिमान वर्गातील आहेत’. ‘१०० पैकी २ अत्यंत हुशार मुले केवळ निवडली गेली आहेत’ इत्यादी. उदाहरणार्थ भारतातील प्रसिद्ध दार – उल् – उलूममध्ये नऊशे जागांसाठी सुमारे नऊ-दहा हजार मुले दरवर्षी प्रवेशपरीक्षा देतात. ९ -१० अशा कोवळ्या आणि संस्कारग्रहणक्षम वयातील ही मुले असतात. मदरसातील सर्व मुले अगदी गरीब घरातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलच असतात असे नव्हे. मध्यम वर्गातील मुलेही मदरसात पाठवली जातात. पण प्रामुख्याने शेतमजुरांची, रोजंदारीवर गुजराण करणाऱ्या लोकांची मुले मदरसात येतात. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात मुलतान, बहावलपूर अशा ठिकाणी ह्याची घनता जास्त दिसून येते. पख्तुनी जमातीमध्ये आपल्या मुलांना मदरसात पाठवण्यावर विशेष भर दिसून येतो. पाकिस्तानातील मदरसात तर मलेशिया, थायलंड, अफगाणिस्थान, उझबेकिस्तान येथूनही मुले दाखल होतात.

प्रशिक्षण – मदरसात शिकवणारे अध्यापक हे स्वतःसुद्धा मदरसातील शिक्षणक्रम पूर्ण केलेलेच असतात. अध्यापक आणि विद्यार्थी अशा सर्वांनीच मदरसाच्या प्रांगणात पूर्णकाळ राहूनच शिकायचे असते. सर्वप्रथम वाचन-लेखन शिकवले जाते. ‘आपल्या देवाला समाधानी करण्यासाठी आपण सर्वस्वसमर्पण करून जिहादसाठी तयार होणे आणि इतरांना तसे बनवणे आणि हे आपले ईश्वरप्रदत्त कार्य आहे असे समजणे’ हा हेतू प्रामुख्याने मदरशातील शिक्षणातून जोपासला जातो. देवबंदी आणि अह्ल-ए-हादिथ या इस्लामिक पंथांमधील अध्यापकांचे मदरशांतून प्राबल्य दिसून येते. ज्यू, ख्रिश्चन आणि हिंदू हे मुस्लिमांवर कसे अत्याचार करत आहेत आणि त्यातून “इस्लाम खतरे में है” हे सतत सांगितले जाते. ८० च्या दशकात जनरल मोहम्मद-झिया-उल्-हक (कारकीर्द १९७७-१९८८) यांनी पाकिस्तानातील शिक्षणाचे जोरदार इस्लामीकरण केले. अशा कट्टर इस्लामिक प्रशिक्षणातून अतिरेकी तयार होणारच नाहीत हे म्हणणे धाडसाचेच ठरेल. झिया-उल्-हक यांचा मोठा वाटा पाकिस्तानातल्या मदरशांत लक्षणीय वाढ होण्यात आहे. तेव्हापासून मदरशांची संख्या वेगाने सतत वाढतीच राहिली आहे. मदरशातील स्नातकांना पाकिस्तानी सैन्यात भारती करण्याची सुरुवातदेखील जनरल झिया-उल्-हक यांच्याच काळात झाली. किंबहुना २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी (आता पैगंबरवासी) अजमल कसाबने आपण मदरशात शिक्षण घेतल्याची कबुली दिली होती. पण असे मदरशातून तयार झालेले युवक हे मनापासून जिहाद करणे हे त्यांचे ईश्वरी कार्य असल्याचे मानतात. आणि जिहाद केल्यावर जन्नत मिळते असाही त्यांचा दृढविश्वास असतो. किंबहुना असे युवक जिहादला निघून जाताना अतिरेकी संघटना त्यांच्या कुटुंबाला पूर्ण सांभाळण्याची ग्वाही देतात. मदरसे या सर्व गोष्टींमध्ये प्रमुख भूमिका पार पाडतात.
तेव्हा मदरशातील प्रशिक्षणक्रमाचा हेतू हा केवळ इस्लामी तत्ववेत्ते तयार करणे असा नसून त्याबरोबरीनेच आक्रमक इस्लामची सैद्धांतिक मांडणी करतील असे विद्वान घडवणे, मदरशात शिकवू शकतील असे अध्यापक तयार करणे, फिलीपाईन्स, थायलंड, मलेशिया अशा ठिकाणी जाऊन नवे मदरसा उघडू शकतील, वेळप्रसंगी जिहादला तयार होतील अशा युवकांना तयार करणे हा आहे.

आर्थिक गणित – कोणतीही संस्था, संघटना चालविताना आर्थिक बाबीचा विचार करावाच लागतो. पाकिस्तानातील मदरसा याला अपवाद नाहीत. २०१२ मध्ये पाकिस्तानी सरकारने जवळपास ७ ते १० कोटी डॉलर्सची मदत मदरशांना दिली होती. त्यामुळे राज्यपुरस्कृत मदरसासुद्धा आहेतच; परंतु पाकिस्तानातील मदरसांचा मुख्य आर्थिक स्त्रोत आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबियाहून प्रचंड प्रमाणावर पैसा हा इस्लामला चालना देण्यासाठी भारतातसुद्धा येत असतो. त्याला ‘पेट्रो डॉलर्स’ ही संज्ञा प्रचलित आहे. असाच निधी पाकिस्तानात सौदीहून पाठवला जातो. जागतिक राजकीय अभ्यासकांचे असे मत आहे की साधारणपणे ८० च्या दशकात सौदी अरेबियाहून पाठवल्या जाणाऱ्या या निधीचा ओघ वाढला आणि त्याचे प्रमुख कारण म्हणजे रशियाशी लढण्यासाठी पाक-अफगाण जमाती तयार करणे, इस्लामचा जागतिक प्रभाव वाढवणे. कसेही असले तरी आज सौदी अरेबिया आणि अरब अमिरातीहून येणारा पैसा हा पाकिस्तानातील मदरशांचा मुख्य आर्थिक आधार राहिला आहे. 
‘पाकिस्तानात आजमितीला २५,००० नोंदणीकृत मदरसे आहेत’ असे ‘इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्यून’ आपल्या अभ्यास अहवालात म्हणतो. आणखी कित्येक मदरसे अनधिकृत आहेत. एकट्या इस्लामाबादेत ८३ बेकायदेशीर मशिदी आणि त्याला जोडलेले मदरसे आहेत. ह्या बेकायदेशीर संस्थांवर हातोडा चालवायला कुणाचीच राजवट धजावत नाही. कारण त्यातून प्रतिकाराची आणि विध्वंसाची एक जबरदस्त लाट येईल असा अंदाज आहे. त्यामुळे किमान हे मदरसे ‘वफकुल मदरिस अल् अरेबिया पाकिस्तान’ आणि ‘तंझीमुल मदरिस पाकिस्तान’ या दोन संस्थांशी जोडले जावेत असा प्रयत्न पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्री रेहमान मलिक यांनी केला. पण तोही असफलच ठरला.
सुधारणा – मदरसांमधील अभ्यासक्रम, इतर संप्रदायांबद्दलचा द्वेष, एकसुरी आणि कट्टर दृष्टिकोन या सर्वांमुळे मदरशातून घटक रसायन तयार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर या भस्मासुराला शांत करण्यासाठी एकूणच मदरसाप्रणाली मध्ये बदल अथवा सुधारणा करण्याची आवश्यकता सर्वांनाच भासू लागली. पाकिस्तानचे वेळोवेळचे राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख यांनी या दिशेने सावध प्रयत्न कमीअधिक प्रमाणात केले. ठराविक मर्यादेपलीकडे तेही काही करू शकले नाहीत. याचे कारण पाकिस्तानातील अत्यंत स्फोटक असलेली परिस्थिती. त्यात मदरशांसारख्या धार्मिक संवेदनशील मुद्द्याला चाळवून आत्मनाश करून घ्यायला ते तयार नाहीत. परवेझ मुशर्रफ यांनी आपल्या कार्यकाळात मदरशांनी जर बाकीचे विषयसुद्धा शिकवले तर त्यांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले, पण मदरशांनी मदत घेऊन नंतर परीक्षणाला ठाम नकार दिला. भारतातसुद्धा अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनामुळे म्हणा अथवा मुस्लीम अनुनायाच्या धोरणामुळे म्हणा, हा प्रश्न जटिल झालेला आहे. मदरशांच्या सुधारणेसाठी खालील उपाय उपयुक्त वाटतात.
१.    सर्व मदरशांना नोंदणी सक्तीची करणे.
२.    सर्व नोंदणीकृत मदरशांना आर्थिक ताळेबंद मांडणे बंधनकारक करणे.
३.    मदरशांमधील अभ्यासक्रमावर निरीक्षकांचे लक्ष असले पाहिजे.
४.    मदरशांमधील मुलांना संगीत, योग असे इस्लामबाह्य अनुभव देणे.
५.    मदरशांना संगणक पुरवून त्यांचे आधुनिकीकरण करणे.
६.    गणित, विज्ञान अशा विषयांचे शिक्षण देणे.
७.    भारतातील मदरशांचे अन्य राष्ट्रांशी सबंध तपासून पाहणे.
८.    मुस्लिम समाजातील उदारमतवादी विचारवंतांची नेमणूक मदरसा प्रबंधक म्हणून करणे.
९.    मदरशांमध्ये खेळ व क्रीडाप्रकारांचे आयोजन करणे.
मदरशांचे उत्पादन – कट्टरता, मूलतत्ववाद हा सर्वच संप्रदाय व उपासनापद्धतींमध्ये कमीजास्त प्रमाणात असला तरी एखाद्या संप्रदायात जर नियमित आणि नियोजनबद्ध रीतीने अशी निर्मितीप्रक्रिया होणार असेल तर त्यावर अंकुश हवा. गेल्या काही वर्षातील दहशतवादी हल्ल्यांमधील आणि आत्मघातकी पथकांमधील पकडले गेलेले जिवंत अतिरेकी जेव्हा चौकशीला सामोरे गेले तेव्हा त्यांनी आपले मूलभूत प्रशिक्षण हे मदरशांतून झाल्याचे मान्य केले. लंडनमधील बॉम्बहल्ला, अफगाणिस्तानात होणारे हल्ले, खुद्द पाकिस्तानमधील आत्मघातकी प्रकार यांना मदरशांतून तयार झालेले कट्टर जिहादी तरुण हे जबाबदार होते. असे प्राणावर उदार होऊन जिहादसाठी तयार युवक घडवणे हे मदरशांचे एक फलित अथवा हेतू आहे.
दुसरा हेतू म्हणजे इस्लामची भूमिका जागतिक विचारवंतांमध्ये ठामपणे मांडणे, वैचारिक व्यासपीठांवरून जिहादची मांडणी करणे आणि अमेरिका, इस्त्रायल, भारत, अशांविरोधात आवाज उठवणे, इस्लामला पोषक असे जन्मात तयार करणे, हिंसक घटनांचे समर्थन करणे अशी कामे मदरशांतून निघालेले काही विद्यार्थी करतात. थोडक्यात कट्टर इस्लामचे समर्थन करणारा विचारप्रवाह मजबूत करून हिंसक इस्लामला तात्विक बैठक प्रदान करण्याचे काम हा गट करतो.
वरील दोन हेतूंव्यतिरिक्त तिसरा हेतू म्हणजे या मदरसांतून तयार होऊन निघालेले काही विद्यार्थी अस्तित्वात असलेल्या मदरशांचे योग्य संचालन आणि नवीन मदरशांचे निर्माण व त्यासाठीचा प्रवास हे काम करतात. वर्तमान मदरशांतून अपेक्षित असे फळ मिळावे यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेऊन असणे, त्यांच्यातील उणीवांची पूर्तता करणे, समस्यांचे निराकरण करणे, नव्या भरतीसाठी प्रयत्न करणे हा झाला एक भाग आणि त्याबरोबरच नवीन मदरसा कुठे स्थापन होऊ शकतात याची चाचपणी करणे, मदरशांच्या स्थापनेनंतर त्यांचे व्यवस्थापन करणे, या नव्या मदरशांवर अध्यापकांची नेमणूक करणे आणि फिलीपाईन्स, मलेशिया, उझबेकिस्तान, भारत, थायलंड, बांगलादेश अशा देशात प्रवास करून नवनवीन मदरसा निर्मितीसाठी प्रयत्न करणे असे काम हा गट करतो. मुल्ला-मौलवी म्हणून ओळखले जाणारे हे मदरशांचे विद्यार्थी थोडक्यात नवीन बीज म्हणून अथवा वादाच्या पारंब्यांसारखे काम करतात ज्यातून मदरसाप्रणाली चालू राहते, पुष्ट होते आणि आणखी वाढते.

          पाकिस्तानात नक्की किती मदरसे आहेत हे कुणीच सांगू शकत नाही कारण त्यांची नोंदणी नाही. अगदी दुर्गम भागातसुद्धा मदरसे चालतात. बरेचदा आंतरराष्ट्रीय संघटनांचे आकडे हे फुगवलेलेही असू शकतात. पाकिस्तानातील मदरशांपैकी ६४ टक्के देवबंदी, २५ टक्के बरेलवी, ६ टक्के अह्ल-ए-हादिथ व ३ टक्के शिया आहेत. २००२ साली पाकिस्तानात सुमारे ९८८० मदरसे होते तर २००८ मध्ये त्यांची संख्या ४०,००० वर पोहोचली. पाकिस्तानातील या सर्व मदरशांपैकी काही मदरशांतून खरोखरीच चांगले प्रशिक्षण दिले जातही असेल. काही हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे परोपकारी विद्यार्थीही बाहेर पडले असतील. पण या सर्व जर-तर च्या गोष्टी झाल्या आणि मदरशांचे समर्थन करणारे याच धर्तीवर म्हणणे मांडत असले तरीही आज इस्लामच्या वैश्विक दहशतवादाला वैचारिक, तात्विक बैठक पुरवणे आणि प्रत्यक्ष जिहादला युवक तयार करणे हेच काम सर्वसाधारणपणे पाकिस्तानातील मदरसे करत आहेत हे सत्य कुणीच नाकारू शकत नाही आणि नाकारल्यास नियती आपल्याला माफ करणार नाही.

Saturday, August 24, 2013

नरेंद्र दाभोळकरांची हत्या आणि शरद पवार…

कै. नरेंद्र दाभोळकरांच्या दुःखद निधनानंतर मी माझ्या फेसबुक भिंतीवर खालीलप्रमाणे ‘कॉमेंट’ केली होती.
दाभोळकरांची हत्या आणि शरद पवार… 

कै. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण हत्येने कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे निश्चित आहे पण सर्व जनतेला आठवते आहे की, महाराष्ट्रातील दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम श्री शरद पवार थोड्याच दिवसांपूर्वी आपल्या वक्तव्याने केले होते…दहशतवाद्यांची बाजू घेऊन त्यांना एक प्रकारची मोकळीकच शरद पवारांनी दिली होती (पुणे येथील भाषण !)
माझे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र आवाहन आहे की जर खरीच इच्छाशक्ती असेल तर इथे तिथे फुकटचे वायबार न काढता शरद पवारांवर खटला भरावा कारण कुणाही सूज्ञाला पुणे येथील त्यांचे दहशतवाद्यांची बाजू घेणारे भाषण आणि कालची धडक कृती याचा सबंध नाकारता येईल???

ज्यावर मोजक्या प्रतिक्रिया आल्या व जवळपास २५ जणांनी आजमितीस ‘लाईक’ केले आहे.परंतु खाजगीत अनेकजणांनी याबाबतीत बोलणे केले. काहींनी नापसंती दर्शविली, काहींनी टीका केली, प्रश्न विचारले, तर्क जाणून घेतला, तर बरेच जणांनी सहमती दर्शवली. पण या सर्वामुळे ती प्रतिक्रिया विस्ताराने विषद करावी असे वाटले आणि त्यामुळे हा लेखनप्रपंच.

दहशतवाद हा एकच प्रकारचा नसतो. स्फोटके, शस्त्रहल्ले इथपासून ते वर्गात मुख्याध्यापकांच्या पाऊलांची चाहूल लागताच धाकाने, दहशतीने चिडीचूप होणारी चिमणी पाखरं, हप्ते वसूल करणारे, वाळूमाफिये, गल्लीचा दादा, वर्गणीखोर या सर्वांची दहशतच असते. दहशतवादाला आर्थिक (व्यापारीवर्गाद्वारे), धार्मिक (जिहाद), भौगोलिक (सीमावाद), राजकीय (निवडणुका-हत्या), जातीय (जात-पंचायती) अशी अनेक कारणे असतात. बॉम्बस्फोट झाला की, आम्ही नेहमीच उच्चरवाने ऐकतो बुआ, ‘दहशतवादाला धर्म नसतो, रंग नसतो वगैरे; पण हिंदुत्वाला दहशतवादाच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या ढुढ्ढाचार्यांनाही आम्ही नेहमीच पाहतो. असो.

तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपींचे दोन संच पकडण्यात आले. एक हिंदू तर एक मुस्लीम. दोघांवरही अजून गुन्हे सिद्ध झालेले नाहीत. पण मुस्लीम युवकांची सुटका करण्यात आली अन् साध्वी प्रज्ञासिंह वगैरे हिंदू गटातील आरोपी (तेही अद्याप निर्दोषच आहेत) मात्र अजूनही तुरुंगातच आहेत. मुळात आधी हा प्रचंड जटिल प्रश्न आहे की, सरकारने दोन विविध तपासयंत्रणांकडे हा तपास वेगवेगळ्या वेळी का सोपवला – NIA (National Investigation Agency) आणि ATS-MH ( Anti Terrorism Squad, Maharashtra). त्यामुळे तपासाचे तीनतेरा तर वाजलेच पण सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला. राज्यकर्ते मोकाटच राहिले आपल्या फायद्यासाठी या तपासाचा वापर करून घ्यायला. आणि त्याचीच परिणती ही शरद पवारांनी अक्कलहुशारीने आपली स्वार्थाची पोळी भाजून घेण्यात केली.
पुण्यामध्ये दि. १० ऑगस्टच्या आसपास भाषण करताना ते म्हणाले की,

 . त्यांची मजल हे म्हणण्यापर्यंत गेली की त्यांनी का या देशाकडे आपला देश म्हणून बघावं? आता अशाप्रकारे दहशतवादाचे अथवा समाजाविरुद्ध घातक काम करण्याचे समर्थन कोणी करणार असेल आणि तेही आमच्यासारख्या कुणी ‘सोम्यागोम्या’ नव्हे तर महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय कृषिमंत्री राहिलेला-असलेला माणूस, तर मग कोणाचे मनोधैर्य उंचावणार नाही हो?!

शिवाय ‘दहशतवादाला धर्म तर नसतोच’ ही बांग आम्ही दिवसातून ५-५ वेळा ऐकतो त्यामुळे पवारांनी केलेले विधान हे समाजातील तद्दन दहशतवादी शक्तींना खतपाणीच होते हे निखालस सिद्ध आहे, जिथे अशाप्रकारे मोकळीक मिळते अथवा दहशतवादाचे स्पष्टीकरण होते तिथे दहशतवादाने डोके वर नाही काढले तरच नवल! म्हणजे गरम तेलात फोडणी टाकायची अन् वर तडतडू नये म्हणून कल्पना करायची हा कोणता शहाजोगपणा?

निश्चितच पवारांनी पुण्यात केलेल्या या अदाकारीमुळे दहशतवाद्यांचे मनोबल वाढल्याचे कोणीही सांगू शकेल. राज्ययंत्रणाच पाठीशी आहे म्हटल्यावर कोण चिंता करतो हो?

कै. नरेंद्र दाभोळकरांची वैचारिक पार्श्वभूमी काय होती, त्यांचा हिंदुत्वाला विरोध होता अथवा नाही; त्यांनी ख्रिश्चन, मुस्लीम संप्रदायातील अंधश्रद्धांवर सोयीस्कर मौन राखले अथवा कसे यासबंधी प्रस्तुत लेखात बोलणे हे विषयांतर होईल; परंतु नरेंद्र दाभोळकरांची हत्या हा निखालसपणे दहशतवाद आहे, कारण ज्या कृत्याने जनसामान्यांच्या मनात प्रथमतः भीतीचे आणि मग रागाचे वातावरण तयार होते – तो दहशतवाद!

नरेंद्र दाभोळकर हे कोण होते हा भाग इथे तितकासा महत्वाचा नाही. ते कुणी तुका बाजी पाटील, रंगा भिवा म्हात्रे अथवा जिवा हरी देठे असा सामान्य अनोळखी, अपरिचित माणूस असता तरीही हा दहशतवादच ठरला असता.

त्यांच्या हत्येचे कारण हे त्यांची अंधश्रद्धाविषयक कामगिरी, धर्मविचारांचे प्रतिपादन याच्याशी सबंधित आहे अथवा मालमत्ता वाद, आर्थिक बाब, मानापमान असे अन्य काहीही आहे यावरूनसुद्धा ‘दहशतवाद’ आणि त्याची भीषणता यात तसूभरही फरक पडत नाही.

याहीपलीकडे अगदी टोकास जाऊन म्हणायचे तर मारेकऱ्यांनी दुसरेच कुणी समजून चुकून नरेंद्र दाभोळकरांना गोळ्या घातल्या असल्या तरीही तो दहशतवादच!
तेव्हा दहशतवादी कृत्य तर होय आणि करणारे कोणीही वर उल्लेखिलेल्या विविध शक्याशक्यतांच्या कोणत्याही हेतूने प्रेरित असले तरीही ते दहशतवादीच नव्हेत काय?

दोन्हीही बाबी आता अत्यंत स्पष्ट दिसू लागलेल्या आहेत. शरद पवारांचे भाषण ही पुढील ‘दहशतवादी’ कृत्यांना प्रेरणा तर आहेच. आणि नरेंद्र दाभोळकर यांची हत्या हे दहशतवादी कृत्य आहे.

म्हणून माझे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगणे आहे, की राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा तर वाजलेच आहेत पण त्यामागे कोण हवा देते आहे हेही निश्चित झालेले आहे. तेव्हा आता अधिक वेळ न दवडता त्वरेने कार्यवाही करावी अथवा कायद्याचे भय आणि समानता ही तत्वे जनमानसाच्या मनातून पुसट होत जातील. आपला कारभार केवळ स्वच्छ असणे गरजेचे नाही तर कर्तव्यकठोर असणेही आवश्यक आहे. शरद पवार आणि तत्सम व्यक्ती यांच्यावर कायद्यानुसार त्वरित कार्यवाही सुरु करावी तर आपल्या कुर्रेबाज केसात कर्तव्याचे पीस खोवले जाईल...